पुणे

Pune News : जंगलचा राजा फोडतोय 24 तास डरकाळ्या!

अमृता चौगुले

पुणे : कात्रजच्या प्राणिसंग्रहालयातील एक सिंह गेल्या दोन महिन्यांपासून चोवीस तास मोठ्याने डरकाळ्या फोडतोय. त्याच्या या डरकाळ्या तो आजारी असल्याचे लक्षण आहे, असा दावा नागरिकांचा आहे. तर उद्यान संचालक म्हणतात, तो आजारी नसून, त्याची ती सवयच आहे. त्याला काहीही झालेले नाही. कात्रज उद्यानाजवळ मोठी रहिवासी वसाहत आहे. वाघ व सिंहांचे पिंजरे रहिवाशांच्या जवळच्या भागात असल्याने त्यांना रोज प्राण्यांचे आवाज येतात.

त्यामुळे प्राणी आजारी असेल तर त्यांच्या आवाजात झालेला बदल आम्हाला कळतो, असा दावा या नागरिकांचा आहे. या भागात राहणारे सचिन जायभाये व सुबोध आंबवणे या दोन तरुणांनी दै. 'पुढारी'शी संपर्क साधून ही बाब सांगितली. ते म्हणाले, आम्ही पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना ही बाब सांगितली. त्यांनी अधिकार्‍यांशी बोलून चौकशी करतो, असे सांगितले. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी त्या सिंहाच्या आवाजात फरक जाणवत नाही. तो सारखा डरकाळ्या फोडतोय. आम्हाला सिंहाच्या आवाजाचा त्रास अजिबात नाही, पण, काळजीपोटी आम्ही प्राणिसंग्रहालयात जाऊन अधिकार्‍यांशी बोललो. मात्र ते म्हणतात की, सिंह ठणठणीतच आहे. त्याची एकदा तपासणी करणे आम्हाला गरजेचे वाटत आहे.

सिंहाचे वय 7 ते 8 वर्षांचे असून तो तरुण आहे. जानेवारी 2020 मध्ये त्याला त्याला इंदूर येथून येथे आणले. तो तेव्हापासून तसाच डरकाळ्या फोडतोय. त्याला काहीही झालेले नाही. ती त्याची सवय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची जागा आम्ही बदलून नव्या खंदकात त्याला स्थलांतरित केले. पण त्याचाही काही परिणाम झाला, असे वाटत नाही. त्याची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नाही.

– डॉ. राजकुमार जाधव,
उद्यान संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज

हेही वाचा

SCROLL FOR NEXT