Katraj Zoo Pudhari
पुणे

Katraj Zoo Encroachment: कात्रज प्राणिसंग्रहालय प्रवेशद्वारावर अतिक्रमण; पर्यटक धोक्यात

खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे पदपथ बंद; पर्यटकांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: पुण्याची शान आणि राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग््राहालय परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राणिसंग््राहालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, पदपथावरील अतिक्रमणामुळे थेट जीव धोक्यात घालून मुख्य सातारा रस्त्यावरून चालण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे.

प्राणिसंग््राहालयात दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. देश-विदेशांतील पर्यटक, शालेय विद्यार्थी, कुटुंबे आणि वन्यजीवप्रेमी मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, प्रवेशद्वार परिसरातील अनियंत्रित स्टॉल संस्कृती आणि अतिक्रमणामुळे प्राणिसंग््राहालयाच्या प्रतिमेलाच धक्का बसत असल्याची तीव भावना पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलपैकी काही अधिकृत असले तरी अनेक स्टॉल्स अनधिकृत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या स्टॉलधारकांकडून ग््रााहकांसाठी पदपथावरच खुर्च्या, टेबल आणि ताडपत्र्या टाकून जागा अडविण्यात येत आहे.

परिणामी वाहनतळापासून प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षितपणे चालण्यासाठी असलेला पदपथच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे पर्यटकांना सातारा रस्त्याच्या मुख्य वाहतूक मार्गावरून चालावे लागत आहे. या मार्गावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने लक्षात घेता मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे 129 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या प्राणिसंग््राहालयात 422 हून अधिक वन्यजीवांचा अधिवास आहे. सिंह, वाघ, बिबटे, हत्ती, गवे, अस्वल, विविध जातीची हरणे, माकडे, मगर, सुसर, सर्प आणि अजगर यांसारख्या प्राण्यांसह समृद्ध वनसंपदा येथे पाहायला मिळते.

अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या प्रवेशद्वारावरच अनियोजित स्टॉल्स आणि अतिक्रमणाचे चित्र दिसत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी वाढत आहे. स्वच्छ, आकर्षक आणि सुरक्षित प्रवेशमार्गाऐवजी गोंधळ, गर्दी आणि अतिक्रमणाचे चित्र पाहायला मिळत असल्याने पर्यटनस्थळाच्या नावलौकिकालाही धक्का बसत आहे. महापालिकेकडून प्राणी संग््राहालय परिसरात विविध विकासकामे सुरू असली तरी प्रवेशद्वार परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे करूनही पर्यटकांना सुरक्षित पदपथ उपलब्ध करून देता येत नसेल, तर प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाल्यास प्राणिसंग््राहालयाची लोकप्रियता आणखी वाढू शकते. पर्यटकसंख्या वाढल्यास महसुलातही भर पडू शकते. मात्र, प्रवेशद्वारावरील अतिक्रमणामुळे पहिल्याच टप्प्यात पर्यटकांचा अनुभव खराब होत असल्याची टीका होत आहे. प्राणीमित्र आणि नागरिकांनी पालिका आयुक्तांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल अन्यत्र स्थलांतरित करून पदपथ मोकळे करावेत, अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत आणि पर्यटकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय तसेच उद्यान विभागाने संयुक्त कारवाई करून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वन्यजीव पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रवेशद्वारावरच अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असेल, तर विकासकामांच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष सुविधा अधिक महत्त्वाच्या ठरतात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

खाद्यपदार्थांचे स्टॉल स्थलांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल. प्राणिसंग््राहालयाला भेटीदरम्यान स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनीदेखील यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
सुरेखा भणगे, सहाय्यक मनपा आयुक्त, धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT