कात्रज : कात्रज चौकात कागदपत्री भूसंपादन केलेल्या 39 गुंठे जागेपैकी केवळ साडेनऊ गुंठे जागेत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मग उरलेली 30 गुंठे जागा नेमकी गेली कुठे? असा प्रश्न नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाहणी दौर्यादरम्यान उपस्थित केला. याबाबत येत्या आठ दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खा. सुळे यांनी आयुक्तांना दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
कात्रज चौकातील नित्याच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी खा. सुळे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाला गती द्यावी, अशी सूचना खा. सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना दिल्या. मागील अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेले हे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन या वेळी आयुक्तांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, सलीम शेख, माजी नगरसेवक विशाल तांबे, सुधीर कोंढरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
कात्रज चौकात कागदपत्री एकूण 39 गुंठे जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यापैकी केवळ साडेनऊ गुंठे जागेत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मग उरलेली 30 गुंठे जागा नेमकी कुठे आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने या प्लॉटच्या भूसंपादनासाठी तब्बल 21 कोटी रुपये मोबदला दिला असतानाही, प्रत्यक्षात मिळालेली जागा ही केवळ उतार्यावर आहे. रस्त्यासाठी प्रत्यक्षात सुमारे साडेनऊ गुंठे जागा वापरली असून, अजून 30 गुंठे जागेचा हिशेब लागत नाही. यामुळे महापालिकेची फसवणूक झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि संबंधित विभागांनी समन्वय साधावा, हे काम तातडीने पूर्ण करावे, असे खा. सुळे यांनी सांगितले. चौकात पूर्वी वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले वॉर्डन अचानक हटविण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदारामार्फत पुन्हा वॉर्डन नियुक्त करण्याच्या सूचना खा. सुळे यांनी दिल्या.
काम करण्यासाठी कात्रजच्या छोट्या उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून परवानगी मिळाली की कामाला आणखी गती मिळणार आहे. आमचा लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण