कात्रज/पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम इस्कॉन मंदिर चौकात वेगाने सुरू आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली. इस्कॉन मंदिर चौकातील काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कामानंतर वाहतूक पूर्ववत करून उर्वरित टप्प्यातील कामावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही या वेळी त्यांनी दिली. (Latest Pune News)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कान्हा हॉटेल चौकातील वाहतूक वळविण्याची अंमलबजावणी, कामाचा दर्जा आणि प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. या वेळी पथ विभागाचे उपअभियंता धनंजय गायकवाड उपस्थित होते.
नवल किशोर राम म्हणाले, ‘इस्कॉन मंदिर चौकातील रस्त्याचे काम आणखी वेगाने पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांकडून समन्वय साधण्यात येईल. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. जागामालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन या वेळी त्यांनी केले. तसेच जागामालकांनी मनात कुठलीही शंका किंवा संकोच ठेवू नये.
भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. योग्य दराने मोबदला देण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या 50 मीटर रुंदीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू असून, त्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जूनपर्यंत कात्रज-कोंढवा रस्त्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल. हे काम माझ्या जबाबदारीतील असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका
रस्त्याच्या कामाचा दर्जा सर्वोत्तम राखावा
आयुक्तांनी शत्रुंजय मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करत पथ विभागातील अभियंते आणि सल्लागारांकडून सविस्तर माहिती घेतली. ‘कामाचा दर्जा सर्वोत्तम राखत ते ठरविलेल्या वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,’ असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उर्वरित भूसंपादनाचे काम लवकरच होणार
उर्वरित 34 मीटर रुंदीच्या पट्ट्याचे भूसंपादनदेखील लवकरच सुरू होणार असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. जमीन मालकांना योग्य मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.