कात्रज: कात्रज-कोंढवा रस्त्याचे वाढते वाहतूक महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकल्पासाठी भूसंपादनाकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असून, जून 2026 पर्यंत पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण प्रकल्पाचा आढावा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून घेण्यात आला. या वेळी आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उप आयुक्त भूसंपादन निखिल मोरे तसेच विशेष भू-संपादन अधिकारी श्वेता दारुणकर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे बनकर आदीसह अधिकारी उपस्थित होते. सध्या या मार्गावर ताशी सुमारे 15 हजारांपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असून, त्यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. परिसरात वेगाने वाढणारा निवासी व व्यावसायिक विकास तसेच मोठ्या प्रमाणावर उभारलेली गोदामे, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव झाली आहे.
प्रस्तावित 84 मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आधिपत्याखालील भूसंपादन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष जागेवर बाँड्री मार्किंग तसेच फळझाडे व इतर झाडांची मोजणी करण्याचे काम सुरू आहे. एकूण 3.5 किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 129 मिळकतींमधील सुमारे 52,630 चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे.
भूसंपादन प्रक्रियेचा अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला असून, लवकरच मंजुरी अपेक्षित आहे. 50 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, पावसाळी वाहिनी तसेच माऊलीनगर येथे ग््रेाडसेपरेटरचा समावेश आहे. तर, 84 मीटर रुंदीच्या अंतिम आराखड्यात मुख्य रस्ता, सेवा रस्ते, पार्किंग, फुटपाथ, सायकल ट्रॅक, युटिलिटी डक्ट, पावसाळी वाहिनी आणि मलवाहिनी यांचा समावेश असेल.
सन 2026-27 च्या अंदाजपत्रकात या कामासाठी रुपये 85 कोटींची तरतूद केली आहे. आत्तापर्यंत सुमारे 32 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत आहेत. नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यांना प्राधान्य देत संबंधित सर्व प्रशासकीय टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्यात येईल.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी