Pune Road Diversion Pudhari
पुणे

Katraj Kondhwa Traffic Change: कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक बदल; गोकुळनगर चौकात यू-टर्न बंद

कोंडी कमी करण्यासाठी नवीन नियोजन; नागरिकांकडून 20 मेपर्यंत सूचना मागविल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्यावर सतत निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गोकुळनगर चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वस्ती असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. याच पार्श्वभूमीवर वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. गोकुळनगर चौकातील थेट यू-टर्न (पंक्चर) बंद करण्यात येणार आहे. चौकात अनियंत्रित वळणे घेतली जात असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठी रांग लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

नवीन नियोजनानुसार, खडी मशिन चौकाकडून खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी गोकुळनगर चौक ओलांडून सुमारे 50 मीटर पुढे जाऊन यू-टर्न घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे, खंडोबा मंदिराकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही खडी मशिन रस्त्यावर पुढे 50 मीटर अंतरावर यू-टर्नची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यामुळे चौकातील अनावश्यक वळणे कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होईल, असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, या बदलांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. 5 मे ते 20 मे 2026 या कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा येथे लेखी सूचना सादर करता येणार आहेत.

प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जारी करण्यात येणार आहे. फायरबिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून वगळण्यात येणार आहे. नागरिकांनी नवीन वाहतूक बदलांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT