दिगंबर दराडे
पुणे : शहर आणि उपनगरांतील रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब तसेच क्लिनिक्समधून बाहेर पडणारा धोकादायक जैववैद्यकीय कचरा आता थेट कात्रजच्या जुन्या आणि नवीन घाटात ’थाटात’ फेकला जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ’मेडिकल कचरा’ कुठं बी ’पसरा’ या प्रवृत्तीमुळे घाटाच्या वन विभागाच्या हद्दीला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून, हा कचरा वन्यजीव आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करीत आहे.
जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी वन विभाग क्षेत्रात रस्त्याच्या कडेला व झाडाझुडपांमध्ये रात्रीच्या अंधारात गाड्यांमधून भरून आणून हा कचरा टाकला जात आहे. यामध्ये मुदत संपलेली इंजेक्शन, सिरींज, रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्या, सलाइनच्या पिशव्या आणि औषधांच्या बाटल्यांचा समावेश आहे. हा जैववैद्यकीय कचरा उघड्यावर पडल्याने तो फुटून त्यातील दूषित घटक माती आणि पाण्यात मिसळण्याची भीती आहे, ज्यामुळे परिसरातील वन्यजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वन्यजीवप्रेमी आणि स्थानिकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर तीव संताप व्यक्त केला आहे. नियमानुसार, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे आणि त्यासाठी ‘पोक्सो’सारख्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेकडून कचऱ्याचे संकलन करून त्यावर मोशी येथील प्रकल्पात प्रक्रिया करणे अपेक्षित आहे, असे असतानाही काही बेजबाबदार वैद्यकीय व्यावसायिक आपला कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकत आहेत, याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
आम्ही मागील काही दिवसांपासून टाकण्यात आलेला कचरा काढत आहोत. आत्तापर्यंत हजारो किलो कचरा आम्ही येथून काढलेला आहे. या कचऱ्यामध्ये मृतप्राणी, मेडिकल वेस्ट, भाजीपाला, जुनी मंदिरे आणि तुटलेल्या मूर्ती या ठिकाणी येऊन टाकतात. मेडिकल वेस्टचा कचरा गुपचूप आणून टाकला जातो. जंगलामध्ये हा कचरा पावसाळ्यात वाहून जातो. या ठिकाणी असलेल्या तलावातील पाणी देखील पिवळे पडले आहे. दिवसेंदिवस हा प्रकार या ठिकाणी घडत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. आम्ही कात्रज घाट स्वच्छता संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत हा कचरा काढण्याचे काम करीत आहोत. पीएमआरडीए, महापालिका आणि वन विभागामध्ये समन्वय नसल्याने ‘मेडिकल वेस्ट’ या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे.विक्रांत सिंग, सामाजिक कार्यकर्ते
आमच्या गावांमध्ये कोणीही कचरा टाकू नये, अन्यथा आम्हाला तीव आंदोलन करावे लागेल. आमची गावे कोणीही कचरा आणून टाकण्यासाठी नाहीत. जर कोणी यापुढे कचरा टाकताना दिसला, तर त्याला आम्ही सोडणार नाही.दीपक गुजर, गुजर निंबाळकरवाडी
परिसरात रोगराई पसरत आहे. ग्रामपंचायत होती तोपर्यंत आम्ही ग््राामपंचायतीच्या वतीने काळजी घेत होतो. आता मात्र महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे आमच्या गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मेडिकल कचरा आणून टाकला जातो. तरी त्यावर योग्य ती कारवाई करावी.विक्रम भिलारे, माजी उपसरपंच, भिलारेवाडी