काटेवाडी: काटेवाडी (ता. बारामती) परिसरात मे महिन्याच्या अखेरीस सलग चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. परंतु, नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचनामे करून नुकसानभरपाईचे आदेश दिले होते, तरीही प्रशासन मात्र हलेना, अशी स्थिती आहे.
या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले होते. माती, ऊस लागवडीसाठी काढलेल्या सर्या वाहून गेल्या आहेत. दुबार पेरणी व मशागतीचे संकट आलेल्या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. 21 ते 25 मेदरम्यान सतत पाऊस बरसत होता. अतिवृष्टीने पताका ओढ्याला महापूर आल्याने शेतात पाणीच पाणी झाले होते. पुरामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे शेताचे बांध फुटले. (Latest Pune News)
शेतातील सुपीक माती खरडून गेली. शेतात दगडगोटे वाहून आले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली ऊस लागवडीसाठी केलेली मशागत वाया गेली आहे. पुन्हा दुबार मशागत करावी लागणार असल्याने मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढेकळवाडी, काटेवाडी परिसरातील शेती, नाले, ओढे यांची पाहणी करून पंचनामे व नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.
शेतीचे पंचनामे केले. मात्र, अद्याप नुकसाईभरपाई शेतकर्यांना मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मे, जूनमध्ये झालेल्या पावसामुळे ऊस लागवड पूर्वमशागतीला सुरुवात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. काटेवाडी ढेकळवाडी, सोनगाव परिसरात दुबार पेरणीचे, तर काही ठिकाणीऊस लागवड मशागतीचे संकट ओढवले आहे.
ऊस लागवडीसाठी मशागत, इतर कामासाठी खर्च झाला होता. मात्र, शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील माती वाहून गेल्याने मोठा खर्च पुन्हा मशागतीसाठी करावा लागणार आहे. शेतीचे पंचनामे केले. मात्र, आम्हाला शासनाच्या माध्यमातून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला शासनाने आमच्या शेताची अवस्था पाहून उचित न्याय द्यावा.- आप्पासाहेब ठोंबरे शेतकरी, ढेकळवाडी