पुणे: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, दि.१५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, खजिनदार हेरंब ठकार आणि विश्वस्त संगीता ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही प्रक्रिया विशेषतः श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे. मंदिर बंदच्या पार्श्वभूमीवर दि 14 डिसेंबर रोजी सायंकाळी महाआरती करण्यात येणार आहे.
शेंदूर कवच काढणे व त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो.
इसवी सन १६१४ च्या आसपास या मंदिराचे उल्लेख आढळतात. जय मिळवून देणारा असा जयति गजानन असे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे. भाविकांसाठी लवकरात लवकर हे मंदिर खुले करण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचा ठकार यांनी यावेळी सांगितले.