Karegaon Nirmala Navale Post After ZP Result: सोशल मीडियावर हजारो-लाखो फॉलोअर्स असले म्हणजे निवडणुकीत यश मिळेलच, असं नाही. हे शिरूर तालुक्यातील कारेगाव गणाच्या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. रिल्समुळे कायम चर्चेत असलेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मनीषा सतीश पाचंगे यांनी सुमारे 329 मतांनी त्यांचा पराभव केला.
निर्मला नवले या कारेगावच्या माजी सरपंच आहेत. आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले सरपंच झाल्यानंतर “उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी” म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. व्हिडीओ, रिल्स आणि फोटो शेअर करत त्या कायम चर्चेत राहिल्या.
काही महिन्यांपूर्वी नवऱ्याने दिलेल्या रेंज रोव्हर कारचा आनंद व्यक्त करतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवर कौतुकासोबत टीकाही झाली. “सरपंच झाल्यावर रेंज रोव्हर?” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या. लोकप्रियता मिळाली, पण त्याचबरोबर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
यंदा राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कारेगाव गणात पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मतदारांनी वेगळाच कौल दिला. प्रचारात सोशल मीडियाची ताकद दिसली, तरी प्रत्यक्ष मतदानात स्थानिक प्रश्न, कामाचा आढावा आणि विश्वास यालाच मतदारांनी जास्त महत्त्व दिलं.
या निकालानंतर त्यांनी पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्ट म्हणते त्यांनी लिहिलं की,
''माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या,
आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. 🙏
आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी
मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले,
रात्रं-दिवस एक करून जे कष्ट उपसले—
त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे.
हा 329 मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे… आणि वेदनादायकही 💔
तो मी मान्य करते.
पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे. ❤️
तुमच्या या साथीनं मला
पुन्हा उभं राहण्याची,
नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे.
ही लढाई इथे थांबत नाही…
तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे.
—
निर्मला शुभम नवले
शुभम नवले''