शिरूर: कारेगाव (ता. शिरूर) येथे बाभुळसर गावच्या शिवेवर परिसरात सोमवारी (दि. २८) सायंकाळी एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८) अशी मयत झालेल्या बालकांची नावे आहेत, तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.
ही घटना सायंकाळी सुमारे ५:४५ वाजण्याच्या सुमारास कारेगाव हद्दीतील बाभुळसर शिवारात असलेल्या एका शेततळ्यावर घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी अनमोल व कृष्णा हे खोल पाण्यात गेले आणि त्यांना बाहेर काढण्यापूर्वीच ते बुडाले. (Latest Pune News)
तत्काळ सर्व मुलांना शिरूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अनमोल व कृष्णा यांना मृत घोषित केले, तर आदेश प्रविण पवार (वय १४) व स्वराज गौतम शिरसाठ (वय १३) या दोघांवर उपचार सुरू आहेत.
ही घटना समजताच मुलाचा चुलत काका प्रदीप पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस गणेश आगलावे हे करत आहेत.या हृदयद्रावक घटनेमुळे कारेगाव गावात शोककळा पसरली आहे.