तळेगाव ढमढेरे : करंदी (ता. शिरूर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या इंडिया वन या एटीएम मशीनचोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीनच रस्त्यावर आणले होते. मात्र, शेजारील दुकानदाराच्या सतर्कतेने चोरट्यांचा हा डाव फसला आहे. त्यांना एटीएम नेण्यासाठी आणलेले पिकअप जागेवर सोडून पळ काढावा लागला. मंगळवारी (दि. 20) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना करंदी येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या इंडिया वन या एटीएम सेंटरसमोर आलेल्या पाच सशस्त्र चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील एटीएम पिकअपला दोरीने बांधून तोडून बाहेर काढले. दरम्यान, मोठ्याने आवाज झाल्याने शेजारील टायरच्या दुकानातील युवक उठून बाहेर आला. त्यावेळी सशस्त्र चोरट्यांनी त्याला शस्त्रे दाखवत दमदाटी केली.
यानंतर दुकानदाराने या प्रकाराची माहिती जागामालक बाळासाहेब ढोकले यांना फोनवरून दिली. त्यानुसार ढोकले कुटुंबीय बाहेर येताच चोरटे त्यांच्याकडील पिकअप तेथेच सोडून पसार झाले, तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते.
या घटनेत एटीएम सेंटरसह एटीएम मशीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर चोरट्यांनी बाहेर काढून आणलेली एटीएम मशीन तशीच बाहेर राहिली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेने लाखोंची रोकड सुरक्षित आहे. यादरम्यान, चोरट्यांनी आणलेले पिकअप वाहन दोन दिवसांपूर्वी न्हावरा येथून चोरीला गेले होते.
याबाबत शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे, तर घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.