

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही भेदभाव नाहीत, तर तालुक्याच्या विकासासाठी आम्हा दोघांचेही योगदान आणि सिंहाचा वाटा आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले; तर राजकारणात वैर नसते. विचारांची लढाई असते, असे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांनी त्यांच्या नव्या मैत्रीची ग्वाही दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा या राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळाच्या चिन्हावर लढवीत असल्याने आमच्या आणि पाटील यांच्या
किती, असा प्रश्नच निर्माण होत नाही. ग्रामीण भागात घड्याळाचे नाते वेगळे असून, सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील आणि जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहील, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सुपुत्र श्रीराज भरणे हे वालचंदनगर-बोरी गटातील बोरी गणातून पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत आहेत. विजयाचा विषय येत नाही. मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील आणि त्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका त्यांची राहील, असेही त्यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही उदयास आली आहे. आम्ही लोकशाहीच्या मागे ठामपणे उभे राहिलो आहोत. घराणेशाहीमुळे उमेदवारी मागायचा अधिकार देखील हिरावून घेतलेल्या जनतेत द्वेष, राग आहेच, हेळसांड झालेला वाऱ्यावर सोडलेला कार्यकर्ता एकजुटीने यांना धडा शिकवत भष्टाचारमुक्त काम करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभा राहील, असे भाजप नेते प्रवीण माने यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली; मात्र आता त्यातील एक पक्ष आमच्यासोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे भाजपने स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे नेते प्रदीप गारटकर यांनी सांगितले. दोन्ही माजी मंत्री एकत्र आले असून, हे टोकाचे विरोधक एकत्र आल्याचे लोकांना आवडणार नसून भाजपला लोक साथ देतील, असेही त्यांनी सांगितले.