पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्र कारचालक मुलाने मद्य पिऊन पोर्श कार भरधाव चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर ससून रुग्णालयात त्याच्या आई-वडील व सहआरोपींनी कट रचून त्याच्यासह मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले.
आपण करीत असलेल्या कृत्याची अल्पवयीन मुलाला माहिती होती. त्याने केलेले दोन्ही गुन्हे हे अतिशय घृणास्पद आहेत. या गुन्ह्यांसाठी दहा वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद लक्षात घेता या मुलाला प्रौढ ठरवून त्याच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यात यावा, असा अंतिम युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सोमवारी बाल न्याय मंडळापुढे केला. (Latest Pune News)
या प्रकरणातील कारचालक बिल्डरपुत्र अल्पवयीन मुलाला प्रौढ ठरवून त्याच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यात यावा, असा अर्ज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाल न्याय मंडळाकडे केला आहे. त्यावर बाल न्याय मंडळाच्या प्रधान न्यायदंडाधिकारी गरिमा बागडोडिया यांच्यासमोर सरकार आणि बचाव पक्षातर्फे सोमवारी अंतिम युक्तिवाद करण्यात आला. या वेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गणेश इंगळे उपस्थित होते. अल्पवयीन कारचालक मुलगा आणि रक्तबदल प्रकरणातील आरोपी शिवानी अगरवालही हजर होते.
अॅड. हिरे म्हणाले, अल्पवयीन कारचालक व त्याचे मित्र अपघातापूर्वी पबमध्ये मद्यपान करीत असल्याचा जबाब साक्षीदारांनी नोंदविला आहे. त्याच्याकडे नोकरी करणार्या चालकाने त्याला कार चालवू नको, असे सांगितल्यानंतरही त्याने ऐकले नाही. त्यानंतर ससून रुग्णालयात स्वतःच्या रक्ताचा नमुना बदलण्याच्या कटातही त्याचा सक्रिय सहभाग आहे.
त्यामुळे त्याचा गुन्हा घृणास्पद वर्गीकृत करून त्याच्यावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालविण्यास परवानगी द्यावी, असा युक्तिवाद या वेळी केला गेला. त्यास बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांनी विरोध करताना विधीसंघर्षित बालकांना सुधारून त्यांचे पुनर्वसन करणे हे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद केले.
किमान सात वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यांना घृणास्पद म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही. कारचालक मुलावर इतर कोणतेही गुन्हे नाहीत. अपघाताची घटना दुर्दैवी असून, त्यामागे त्याचा कोणताही हेतू नसल्याने कलम 304 आणि कलम 467 लागू होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.