

पुणे: दिवसभर मजुरी करणार्या नागरिकांना कामाच्या वेळेनंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाने ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना साकारली. महापालिका हद्दीत 58 दवाखाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दीड वर्ष उलटून गेल्यावरही महापालिकेने केवळ एकच दवाखाना सुरू केला आहे.
राज्य शासनाने महापालिका हद्दीमध्ये 58 आपला दवाखाना सुरू करण्याच्या सूचना फेब—ुवारी 2024 मध्ये महापालिकेला दिल्या होत्या. त्यासाठी जागा भाड्याने घेण्यास सांगण्यात आले. मात्र, इतर जागा भाड्याने देण्याऐवजी महापालिकेच्या मालकीच्या जागाच दवाखान्यासाठी वापराव्यात, असा प्रस्ताव तत्कालीन महापालिका आयुक्तांकडून ठेवण्यात आला. (Latest Pune News)
त्यानुसार जागांचा शोध सुरू झाला. आत्तापर्यंत आरोग्य विभागाला केवळ 25 जागा मिळाल्या आहेत. तेथे रंगरंगोटी, दुरुस्ती, फर्नचिर यासाठी राज्य शासनाने पैसे द्यावेत, असा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाला पाठवला होता. तसेच, 58 जागांवर दवाखाने सुरू करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली होती.
त्यानंतर अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वाघोली येथे केवळ एकच दवाखाना सुरू झालेला आहे. दिवसभर मोलमजुरी करणार्या नागरिकांना संध्याकाळी दवाखान्यात जाता यावे, यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू करून त्याची वेळ 2 ते 10 असावी, अशी कल्पना मांडण्यात आली.
त्यासाठी प्रत्येक दवाखान्याच्या जागेसाठी 1 लाख रुपये देण्याचे राज्य शासनाने मंजूर केले. मात्र, पुणे महापालिकेकडून आपला दवाखानाबाबत दिरंगाई केली जात आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांना विचारणा केली जाणार असल्याचे आरोग्य हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
‘आपला दवाखाना’चा मूळ हेतू तरी काय?
झोपडपट्टी परिसरात आणि दुर्गम भागामध्ये राहणार्या नागरिकांना तब्येतीच्या लहान तक्रारींसाठी महापालिकेचा दूरचा दवाखाना गाठावा लागू नये, यासाठी वस्त्यांमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. महिन्यातील एक दिवस ठरवून नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.