नारायणगाव : काळवाडी परिसरामध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात असून परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर या बिबट्याने अनेकदा हल्ला करून ती फस्त केली आहेत. येथे बिबट्याला पकडण्यासाठी एक महिन्यापासून पिंजरा लावला आहे. बिबट्या पिंजऱ्याभोवती घिरट्या घालतोय, परंतु पिंजऱ्यात काही येत नाही. त्यामुळे वन खात्याने या बिबट्याला पकडण्यासाठी काही वेगळी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे.
संपत वामन यांच्या घराजवळ हा बिबट्या वारंवार येत आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात हा बिबट्या अनेकदा कैद झाल्यामुळे त्यांनी वन खात्याकडे तक्रार केल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावला. अनेकदा पिंजऱ्याची जागा देखील बदलली आहे, परंतु बिबट्या काही पिंजऱ्याला दाद देत नसल्याचे दिसत आहे. तो वन खात्याला हुलकावणी देतोय. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याला भक्ष म्हणून कोंबडी ठेवलेली आहे. हे भक्ष खाण्यासाठी तो पिंजऱ्याभोवती घिरट्या घालतो, परंतु पिंजऱ्यात येत नसल्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागली आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ व्यक्ती व शाळकरी मुलांना बिबट्याच्या भीतीमुळे खेळता देखील येत नाही. अभ्यास झाल्यावर मुलांना अंगणात खेळायला पालकांना पाठवता येत नसल्यामुळे मोबाईलच त्यांच्या हातामध्ये देणे याशिवाय पालकांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होण्याची भीती पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे.
काळवाडी या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याची जागा बदलण्यात येईल. लवकरात लवकर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद कसा होईल, याबाबतची दक्षता घेण्यात येईल.चैतन्य कांबळे, वनक्षेत्रपाल