Witchcraft Pudhari
पुणे

Kalamb Witchcraft Incident: कळंबच्या स्मशानभूमीत पुन्हा जादूटोण्याचा प्रकार; गावात भीती आणि संताप

दुसऱ्यांदा आढळलेल्या अंधश्रद्धेच्या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक; कडक कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब गावातील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार दुसऱ्यांदा आढळून आल्याने बुधवारी (दि. 21) परिसरात घबराट पसरली असून, ग््राामस्थांमध्ये तीव संताप व्यक्त करण्यात येत आहे. समाज प्रगतशीलतेकडे वाटचाल करीत असताना अशा अंधश्रद्धेला पूरक घटना पुनःपुन्हा समोर येणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

स्मशानभूमीत दगडांची मांडणी करून ओटीचे साहित्य, फळे, दोन नारळ, हळदी-कुंकू व शेंदूर ठेवण्यात आले होते. तसेच कोहळा व कच्ची पपई कापलेली, दहा ते बारा लिंबे व ईडलिंबू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. कळंब सोसायटीचे संचालक अभिजित भालेराव हे त्यांच्या दिवंगत आईच्या महिन्याच्या विधीसाठी स्मशानभूमीत गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच संतोष भालेराव, ग््राामपंचायत सदस्य दत्तात्रय कानडे, महेंद्र पारधी व बाळासाहेब भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा व निंदनीय असून अशा कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

कडक कारवाई करणार

जादूटोणा व अंधश्रद्धा यांसारख्या चुकीच्या मार्गांऐवजी योग्य उपचार, वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजप्रबोधनाची आवश्यकता असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे तसेच नागरिकांनी व्यक्त केले. पुन्हा असा प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तींवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी उपसरपंच भालेराव यांनी दिला.

स्मशानभूमीला कुंपण करण्याची मागणी

स्मशानभूमीत अशा घटना वारंवार घडत असल्याने कळंब ग््राामपंचायतीने पुढाकार घेऊन स्मशानभूमीला चारही बाजूंनी तारेचे कुंपण किंवा भिंत उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच रस्त्याकडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरण करावे, अशी मागणी अभिजित भालेराव यांनी केली आहे.

उपाययोजना लवकरच करणार

या घटनेचा सरपंच उषा कानडे व उपसरपंच कमलेश वर्पे यांनी तीव निषेध नोंदवला असून, स्मशानभूमीच्या अद्ययावत कामांसह आवश्यक उपाययोजना लवकरच करण्यात येतील, असे आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT