बापू रसाळे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 6 जागा महिला उमेदवारांना राखीव झाल्याने दिग्गज नेत्यांचे स्वप्न भंगले आहे.(Latest Pune News)
पुणे जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण सोमवारी (दि. 13) जाहीर झाले. जुन्नर तालुक्यातील 8 जागांसाठी तसेच पंचायत समितीच्या 16 जागांसाठी मनासारखे आरक्षण न पडल्याने दिग्गज उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे. नारायणगाव-वारुळवाडी गटात यापूर्वी देखील महिला आरक्षण होते. या वेळी पुन्हा इतर मागासवर्ग महिला, यासाठी आरक्षित झाल्याने संभाव्य जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. याशिवाय मावळते जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अंकुश आमले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्याही मनसुब्यावर पाणी पडले आहे.
पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण यापूर्वीच अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने सभापतिपदासाठी देखील
अनेक सर्वसाधारण गटातील इच्छुकांची निराशा झाली आहे. मात्र, काही विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
आरक्षण सोडतीनंतर राजकारण ढवळून निघाले आहे. आरक्षण जरी वेगळे आले असले, तरीही आपल्या मर्जीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेतेमंडळींनी हालचालींना सुरुवात केली आहे. नव्या उमेदवारांना मिळालेल्या संधीचे सर्वत्र स्वागत होत आहे.