Junnar water scarcity Pudhari
पुणे

Junnar water scarcity: जुन्नर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई! 12 गावांमध्ये टँकर सुरू; 8 गावांना मंजुरी

सभापती शेळकंदे यांनी सांगितले की, यंदा तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये तसेच उत्तर विभागातील कोपरे-मांडवे परिसरात पाणीटंचाई तीव झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: यंदाचा उन्हाळा अत्यंत तप्त असल्यामुळे जुन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 12 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून, आणखी 8 गावांना टँकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर पंचायत समितीच्या सभापती कमल शेळकंदे यांनी दिली.

सभापती शेळकंदे यांनी सांगितले की, यंदा तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये तसेच उत्तर विभागातील कोपरे-मांडवे परिसरात पाणीटंचाई तीव झाली आहे.

त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने टँकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा उन्हाळा भीषण असल्याने जुन्नर पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग तालुक्यातील प्रत्येक गावे व वाड्यांशी सतत संपर्कात आहे.

गोद्रे, कोपरे, मांडवे, अजनाळे, सुकाळवेढे, निमगिरी, हडसर, पेठेचीवाडी, कोटमवाडी, गुळुंचवाडी, शिंदेवाडी आणि नळावणे या 12 गावांमध्ये लोकसंख्येनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार त्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

तसेच तळेरान, आंबे, तांबे, हातवीज, शितेवाडी, देवळे, बांगरवाडी, खैरे आणि खटकाळे या गावांना टँकर सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, तेथेही लवकरच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. चावंड वडगाव आनंद या गावचा पाण्याचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव आला असून, तातडीने प्रशासकीय मंजुरी घेऊन तेथे देखील केला जाईल, असे शेळकंदे यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्‌‍ट्यात उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवली आहे. यावर उपाय म्हणून पंचायत समितीमार्फत परिस्थितीचा आढावा घेऊन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच ज्या ठिकाणी हापसे (हातपंप) नादुरुस्त आहेत, त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. ज्या गावांमध्ये किंवा वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासेल, त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा. तेथे प्रशासनाची मंजुरी मिळताच त्वरित टँकर सुरू करण्यात येतील, असेही शेळकंदे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT