

पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मुंबई आणि पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे रवाना झाल्याने इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना तासनतास अडकून राहावे लागले.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळपासूनच पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. दुपारपर्यंत सरडेवाडी टोल नाका परिसरात वाहतुकीचा ताण अधिक वाढला आणि परिस्थिती गंभीर झाली.
टोल नाक्याजवळ जवळपास एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार, खासगी बस, प्रवासी वाहने आणि मालवाहतूक वाहनांची मोठी गर्दी रस्त्यावर दिसत होती. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या विशेषतः जास्त होती. टोल नाक्यावर एकूण १३ लेन असून त्यापैकी ६ लेन या सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आहेत. मात्र या सर्व लेनवर सतत वाहनांची गर्दी असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत होते.
फास्टटॅग सुविधा उपलब्ध असतानाही वाहनांची संख्या इतकी वाढली होती की, टोल प्लाझावर वाहतूक मंदावली. परिणामी वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. भर उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वाहनांमध्येच तासनतास थांबून होत्या. काही वाहनचालकांनी वाहतूक व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी टोल प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची संख्या सतत वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागत आहे. पुढील दोन दिवस सुट्ट्या असल्याने महामार्गावर आणखी गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने प्रवाशांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.