खोडद: वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे शंभू महादेवाच्या यात्रोत्सवानिमित्त शंभू महादेव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय बैलगाडा शर्यतीत राज्यभरातील तब्बल 300 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील बैलगाडे या शर्यतीसाठी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची फळीफोड देवांश अक्षय पोखरकर व जाणकू काशिनाथ पानसरे यांच्या बैलगाड्याने केली, तर द्वितीय क्रमांकाची फळीफोड मंगेश भगवान मुळे व तबाजी दत्तात्रय काळे यांच्या बैलगाड्याने केली. फायनल फेरीत अनुप नामदेव मुळे व पाटीलबुवा बाळाजी दाभाडे यांची बैलगाडी प्रथम क्रमांकावर आली.
प्रथम क्रमांकाच्या फेरीत 55, तर द्वितीय क्रमांकाच्या फेरीत 140 बैलगाड्यांनी धाव घेतली. घाटाचा राजा ठरलेल्या पांडुरंग काळे यांच्या बैलगाड्याला बुलेट दुचाकी बक्षीस देऊन गौरविण्यात आले.प्रथम क्रमांकासाठी 1 लाख 11 हजार 111 रुपये, तर फळीफोड गाड्यांसाठी 15 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख 1 हजार रुपये, तर फळीफोड गाड्यांसाठी 10 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
घाटाचा राजा स्पर्धेसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे : पहिला क्रमांक (फायनल) : 81 हजार रुपये, दुसरा : 61 हजार रुपये, तिसरा : 41 हजार रुपये, चौथा : 31 हजार रुपये, पाचवा : 21 हजार रुपये, सहावा : 15 हजार रुपये, सातवा : 11 हजार रुपये, आठवा, नववा व दहावा : प्रत्येकी 10 हजार रुपये.
या यात्रोत्सवाला माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माऊली खंडागळे, बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे, नवाजी घाडगे, वैभव तांबे, संभाजी चव्हाण, सरपंच उल्का पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली, अशी माहिती माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली.