ओतूर: जुन्नर तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलानेच आपल्या वडील व लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना पारगाव तर्फे मढ हद्दीतील बगाडवाडी येथे घडली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम महादू मुकणे (वय ६०) व राजेंद्र जयराम मुकणे (वय २७) यांची त्यांच्याच मुलगा व भाऊ बाबाजी जयराम मुकणे (वय ३३) याने दगडाने ठेचून हत्या केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सदर घटना मंगळावारी रात्री घडल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना ओतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली. प्राथमिक तपासात जमीन, पैसा व कौटुंबिक कलह यावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.