Junnar Hotel Attack Pudhari
पुणे

Junnar Hotel Attack: हॉटेलमध्ये घुसून धुडगूस,मारहाण, तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी; ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल

लोखंडी रॉड, चाकूचा धाक दाखवत हल्ला

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील करंजाळे येथील “माळशेज लेक” या हॉटेलमध्ये घुसून हॉटेल चालक व त्यांच्या कुटुंबीयांना काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण करत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रंजित रविंद्र शिंदे (वय ३०, व्यवसाय- हॉटेल, रा. करंजाळे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महेंद्र पोपट गायकवाड, शैलेष जगन्नाथ गायकवाड, राजू गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही, तिघे रा. सीतेवाडी ता. जुन्नर) तसेच इतर तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २२) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करंजाळे गाव हद्दीतील “माळशेज लेक” हॉटेलमध्ये फिर्यादी रंजित शिंदे, त्यांचा भाऊ अरुण व आई पार्वती हे काम करत असताना आरोपी तेथे आले. “गौतम लोखंडेला मारता काय, तुम्हाला दाखवतो काय असतं ते,” असे म्हणत आरोपींनी वाद घालत अचानक हल्ला चढवला.

यावेळी आरोपींनी हातातील काठ्या, दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी तिघांना मारहाण केली, तसेच लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवत “तुम्हाला संपवून टाकतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. हल्लेखोरांनी हॉटेलमधील कॅश काउंटर, प्लास्टिक टेबल व खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले.

या गोंधळात फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हरवल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत रंजित शिंदे, त्यांचा भाऊ व आई जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT