पुणे

वाडा : जुना वाडा गावच्या आठवणीत अनेकांचे डोळे पाणावले

अमृता चौगुले

आदेश भोजने

वाडा (पुणे) : खेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले जुना वाडा गाव आज धरणात लुप्त झाले आहे. मात्र मे महिनाखेरीस चासकमान धरणातील पाणी साठा तळाशी गेल्यावर हे जुने वाडा पुन्हा दिसू लागले. परिणामी, 1994 नंतर पाण्यात गेलेल्या या गावातील ग्रामस्थांच्या जुन्या वास्तूंच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत.

चासकमान धरणाच्या बांधकामास 1978 साली सुरुवात झाली. त्यानंतर जुना वाडा गाव हा विस्तापित होण्यास सुरुवात झाली. अनेक जण बाहेरगावी तर अनेकजण जवळच वसवलेल्या नवीन वाडात स्थायिक झाले. चासकमान धरणाचे पाणी 1994 साली अडविण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र जुना वाडा नदीच्या पाण्यात लुप्त झाला. अनेकांच्या आठवणी भीमा नदीपात्रात तशाच साठून राहिल्या. 1973 साली चासकमान धरणाचे बांधकाम सुरू झाल्यावर शासनाने गावचे पुनर्वसन शिक्रापूर येथील वाडा गावठाणात केले.

मात्र, काहीजण गावचे उत्तरेस असलेल्या मोकळ्या जागेत प्रस्थापित होऊन तेथे नवीन बाजारपेठ तयार झाली. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा पाणी साठा कमी झाल्यानंतर 29 वर्षांनंतरच्या अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या. अनेकजण जुन्या गावाला भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, पश्चिम भागातील गावांना जोडणारा पूल मात्र दिसत नाही. या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, वसतिगृह, हॉटेल, राईस मिल होत्या. अनेक सोयीसुविधांनी युक्त जुन्या गावच्या आठवणी अजूनही अनेकांचे डोळे पाणावत आहेत.

गाव बुडाले; मात्र मंदिरे सुस्थितीत

जुना वाड्यातील आकर्षक दगडी मंदिरे आहे तशीच धरणात अस्तित्वात आहेत. पुरातन दगडी बांधकामातील महादेवाचे मंदिर आजही सुस्थितीत आहे. बाजारपेठेचे अवशेष, ग्रामदैवत धर्मराज मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरे पाण्यातून वर येत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT