पुणे

पत्रकारांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत : सौरभ द्विवेदी यांचे मत

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'तुम्हाला जे मांडायचे आहे, त्याबाबत स्पष्टता हवी. आपल्याकडील ज्ञान हे अगदी सोप्या शब्दात लोकांना आपल्या प्रेक्षकांना समजावता आले पाहिजे. योग्य, उच्च आणि खरी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद पाहिजे. पत्रकाराने प्रश्न विचारलेच पाहिजेत. सत्ताधारी असो की, विरोधी पक्षातील नेते असो, पत्रकाराने जनतेच्या वतीने प्रश्न विचारायचे काम केलेच पाहिजे,' असे मत पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे पुस्तक महोत्सवात राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुलाखतीत द्विवेदी बोलत होते. प्रा. योगेश बोराटे यांनी द्विवेदी यांची मुलाखत घेतली. द्विवेदी म्हणाले, 'प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांना नागरिकांनी आपला पाठिंबा आणि सहकार्य दिले पाहिजे. आमच्याकडे कोणी उच्च आणि कोणी निम्न नाही, तर सर्वांना समान वागणूक आहे. जुन्या आणि नव्याचा संगम आहे. त्यामुळे सामान्य जनतेशी आमची नाळ जुळली राहते.

महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे येथील संस्कृती आणि मराठी भाषा ही अन्य राज्यातील लोकांनीही शिकली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून मी मराठी शिकत आहे.' पुढच्या वेळी पुण्यात कार्यक्रमाला आल्यानंतर, मराठीत संवाद साधणार असल्याचा विश्वास द्विवेदी यांनी दिला.

पुणे हृदयाच्या जवळ…

'पुणे शहर मनापासून आवडते. या शहराची ऐतिहासिक परंपरा, संस्कृती, संताची परंपरा, शैक्षणिक महत्त्व अद्भुत आहे. अनेक मित्र या शहरातील आहेत. महाभारतात संशोधन केलेली भांडारकर संस्था, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फर्ग्युसन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संस्था अशा नामांकित संस्था इथे आहेत. त्यामुळे हे शहर माझ्या हृदयाच्या जवळ आहे,' असे द्विवेदी यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT