Pune Police, NSG joint operation
पुणे : शहरातील संवेदनशील भागांत, गर्दीचे परिसर तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षारक्षक (एनएसजी) आणि पोलिसांकडून ‘जॉइंट ऑपरेशन’ राबविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत संरक्षणाच्या पूर्वतयारीसाठी एनएसजी आणि स्थानिक पोलिसांकडून ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून शहरात सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. बुधवारी (दि.7) शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते. भारताकडून बुधवारी (7 मे) ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले.
यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. तसेच बुधवारी देशात 259 जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रात 16 ठिकाणी नागरी संरक्षण तयारीसाठीचे मॉक ड्रील करण्यात आले. पुण्यातही तीन ठिकाणी अशा स्वरूपाच्या मॉक ड्रीलचे आयोजन केले होते. त्यासोबतच केंद्रीय यंत्रणा आणि पोलिस संयुक्तपणे शहराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असल्याचे समोर येत आहे. केंद्रीय आणि स्थानिक यंत्रणांच्या संयुक्त मोहिमेच्या माध्यमातून शहरातील सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला आहे.
पोलिसांकडूनही स्वतंत्रपणे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. बुधवारी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे रूट मार्च काढण्यात आले.