पुणे : औंध येथील जैवविविधता उद्यानातील (बोटॅनिकल गार्डन) जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला अद्याप अपयश आल्याने मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाला (जायका) अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणखी दोन वर्षे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आता केंद्र सरकारकडे मुदतवाढ मागण्याचा विचार करत आहे.(Latest Pune News)
मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत औंधमधील जैवविविधता उद्यानातील (बोटॅनिकल गार्डन) 30 गुंठे जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणीसाठी तेथील जैवविविधता वारसास्थळाचे (बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट) आरक्षण उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या निर्णयाला राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे तेथील निर्णय शासनाच्या विरोधात गेल्यास प्रकल्पाचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. परिणामी, हा प्रकल्प रखडणार आहे. जपानमधील जायका संस्थेमार्फत पुणे महापालिकेच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी 11 सांडपाणी प्रक्रिया केंद्रे शहरात उभारली जाणार आहेत. यापैकी 10 केंद्रांची कामे सुरू झाली असून, त्यांचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मात्र, औंध येथील जैवविविधता उद्यानातील शुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागा अद्याप महापालिकेला मिळालेली नाही. सुमारे 1,472 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, जागा ताब्यात न आल्याने या प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच जैवविविधता उद्यानातील जागा तातडीने महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. तरीही जागा प्रत्यक्ष ताब्यात न आल्याने पालिकेची कोंडी झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या केंद्राचे काम सुरू करण्यासाठी जागा मिळाल्यानंतर किमान दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी मुदतवाढ घेण्याची गरज भासणार आहे.