पुणे : आम्ही पोलिस आहोत, येथे मर्डर झाला आहे. अशी बतावणी करत चोरट्यांनी देवदर्शनासाठी निघालेल्या ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील 6 लाख 24 हजार रुपये किंमतीचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात महालक्ष्मीनगर वारजे येथील 61 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) सायंकाळी साडेपाच वाजता अविस्मरा हॉलजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला देवदर्शनासाठी निघाल्या असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहोत, येथे मर्डर झाला आहे, तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून अंगावरील दागिने काढा आणि बॅगेत ठेवा, असे सांगत त्यांनी पोलिस असल्याचा बनाव केला.
चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादींनी त्यांच्याकडील दागिने बॅगेत ठेवताच चोरट्यांनी ती बॅग हातचलाखीने चोरून नेली. या घटनेचा तपास वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप आरोपींचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत शहरात पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलांना लुटल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.