जेजुरी: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर माऊलीनगर परिसरात सोमवारी (दि. २३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दाम्पत्य नाझरे कडेपठार येथील खैरेवस्तीचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील महेंद्र नाझीरकर आणि रेशमा नाझीरकर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने महाराष्ट्र शासनाच्या १०८ नंबर वरील रुग्णवाहिकेने उपचारासाठी जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या अपघाताची माहिती परिसरात समजताच नाझरे कडेपठार आणि खैरेवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.अपघाताची अधिकृत माहिती, पोलिसांची नोंद आणि पुढील तपासाबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.