Jejuri Yatra Pudhari
पुणे

Jejuri Yatra: जेजुरीत चैत्री पौर्णिमा यात्रेला भक्तांची अलोट गर्दी

खंडोबा अवतार दिनानिमित्त दवण्याची पूजा; शिखर काठ्यांच्या देवभेटीने गड दुमदुमला

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी: चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अवतार दिनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी कुलधर्म-कुलाचारानुसार धार्मिक विधी पार पाडत देवाला प्रिय असणाऱ्या सुगंधी दवण्याची पूजा केली गेली.

चैत्री शुद्ध पौर्णिमेला चित्रा नक्षत्र व वसंत ऋतूच्या शुभ मुहूर्तावर श्री शंकरांनी मार्तंड भैरवाचा, म्हणजेच खंडोबा देवाचा अवतार धारण केल्याची पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी जेजुरीत दरवर्षी मोठी यात्रा भरते.

यंदाही बहुजन बांधव व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने गडावर दाखल झाला होता. गावोगावच्या शिखर काठ्या वाजत-गाजत जेजुरी गडावर पोहोचल्या. शिखर काठ्यांची देवभेट होताच हजारो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत ‌‘येळकोट येळकोट जय मल्हार‌’आणि ‌‘सदानंदाचा येळकोट‌’अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला.

दवणा अर्पण करण्याची परंपरा

दवणा ही सुगंधी वनस्पती खंडोबा देवाला प्रिय मानली जाते. गुढीपाडव्यापासून चैत्री महिन्यात देवाला दवणा अर्पण करण्याची परंपरा आहे. जेजुरीसह कोल्हापूरचा ज्योतिबा, शिंगणापूरचा शंभू महादेव, कार्ला येथील एकवीरा आणि गावोगावचे भैरवनाथ यांनाही दवणा अर्पण केला जातो.

चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा व गडकोट फुलांनी सजविण्यात आला होता. देवाचे मानकरी सचिन झगडे यांनी दवणा अर्पण करून महापूजा केली. या वेळी फळे, फुले, पाने, धान्य, भात आणि दवणा यांचा समावेश असलेल्या सप्तपूजा विधी पार पडले.

यंदा गर्दी घटली

यात्रेदरम्यान देवदर्शन, तळी-भंडारा, तसेच जागरण-गोंधळ आदी पारंपरिक विधी भाविकांनी श्रद्धेने पार पाडले. पुजारी वर्गाच्या निवासस्थानी आणि ऐतिहासिक चिंचेच्या बागेतही धार्मिक कार्यक्रम रंगले होते. दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती असलेल्या या यात्रेत यंदा अपेक्षेपेक्षा कमी गर्दी दिसून आली. गावोगाव सुरू असलेल्या जत्रा, शालेय परीक्षा, कडक उन्हाळा आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या काहीशी घटल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही जाणवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT