जेजुरी: लाखो भाविकांचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचे लेणे असणाऱ्या भंडाऱ्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे जेजुरीकरांनी स्वागत केले आहे. भेसळ व केमिकलयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
भेसळ व केमिकलयुक्त भंडाऱ्यामुळे कपाळावर आग होऊन काळे चट्टे पडणे, डोळ्यांची व त्वचेची आग होणे, भंडारा ग््राहण केल्यामुळे जळजळ होणे, असे प्रकार घडत होते. पाच महिन्यांपूर्वी जेजुरी नगरपरिषदेच्या निकालाच्या वेळी विजयी उमेदवार गडाच्या पायथ्याशी देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता भंडाऱ्याचा भडका उडून वीसहून अधिक नागरिक भाजले गेले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री मार्तंड देवसंस्थान, श्री खंडोबा पालखी सोहळा समस्त ग््राामस्थ मंडळ, नगरपरिषद व विविध संघटनांनी अन्न व औषध विभागाकडे याबाबत निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली होती. याचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. त्यानंतर भंडाऱ्याबाबत धोरण ठरविण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळ यांनी बैठक आयोजित केली.
या बैठकीत देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा ’भंडारा’ शुद्ध हळदीच्या स्वरूपातच उपलब्ध असावा. विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार अन्न परवाना घेऊनच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. यामुळे भेसळयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभाग कार्यवाही करणार आहे.
नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी या सकारात्मक निर्णयाचे स्वागत केले आहे. बनावट भंडारा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत शासनाच्या आदेशाची अंमबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्री खंडोबा पालखी सोहळा, खांदेकरी मानकरी ग््राामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी व्यापाऱ्यांनी शुद्ध भंडारा विक्रीसाठी ठेवावा, असे आवाहन केले आहे. देवाचे पुजारी असणाऱ्या गणेश आगलावे यांनी या सकारात्मक निर्णयाचे पुजारीवर्गाच्या वतीने स्वागत केले.