पुणे: राज्य कृषी पणन मंडळाच्या पुढाकाराने शिक्षण-प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या तळेगांव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) ही सध्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने तोट्यात आहे.
त्यावर कृषी पणन मंडळाकडून एनआयपीएचटी संस्थेला दोन कोटी रुपयांइतकी निधी उधार-उसनवारीवर देण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. (Latest Pune News)
पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच एनआयपीएचटी संस्थेच्या अडचणी व उपाययोजनांवर बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती गुरुवारी (दि.10) मिळाली. बैठकीस एनआयपीएचटीचे संचालक मिलिंद आकरे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक नितीन पाटील व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आकरे यांनी बैठकीत एनआयपीएचटी संस्थेचे कामकाज, सध्याचे आर्थिक उत्पन्न व होणारा तोटा आणि उपाययोजनांवर विस्तृत माहिती दिली. तसेच मार्च 2026 अखेर एनआयपीएचटी संस्थेचे उत्पन्न 13 कोटींहून अधिक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
त्यावर बैठकीत चर्चा झाली आणि पणन मंडळाकडून उसनवारीवर दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय पणन मंत्री रावल यांनी दिला. त्यानुसार एनआयपीएचटीला प्राप्त होणार्या निधिीतून मागील अधिकारी-कर्मचार्यांच्या थकीत असलेला 90 लाख रुपयांचा पगार, 60 लाख रुपये संबंधितांची देणी देण्यासाठी आणि 50 लाख रुपये खेळत्या भांडवलापोटी देण्याचा निर्णय झाला आहे.
पणन मंत्र्यांच्या सूचना...
एनआयपीएचटी संस्थेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करावी, रिक्त जागांवर प्रतिनिधींची नेमणूक करा.
एनआयपीएचटी संस्थेमध्ये केंद्र सरकारचे टी बोर्ड, बांबू बोर्ड, स्पायसेस बोर्ड, सीड कंपनी, संशोधन संस्था, औषधी कंपन्या, खत कंपन्या, कृषी विद्यापीठांच्या परिषदांचे आयोजन करुन निधी उभारावा.
एनआयपीएचटी संस्थेस जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी मिळण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, गुंतवणूकदार शोधावेत.
तळेगांव व आजूबाजूच्या फुल उत्पादक शेतकरी, कंपन्यांसाठी प्रशिक्षणे घ्यावीत.
एनआयपीएचटी संस्थेअंतर्गत एमबीए कॉलेज पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करुन देशात घेतल्या जाणार्या सर्व कोर्सेसचा समावेश करावा.