पिंपरी(पुणे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मताचा अधिकार दिला आहे. ती ताकद सत्ता बदलू शकते. सध्या देशात राजकीय परिस्थिती बिकट आहे. निवडणुका आता विकासकामावर होणार नाहीत, तर त्या विचारावर लढल्या जातील. देशातील प्रत्येक माणसाचा विचार हा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या वतीने डॉ. अशोक शिलवंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सोमवारी (दि.9) झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, खासदार श्रीनिवास पाटील, आचार्य रतनलाल सोनग्रा, भन्ते राजरतन, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, आपल्या शिक्षणाचा पाया कमी असल्याने असे घडत आहे. शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार झाला पाहिजे. संस्कारातून शिक्षणाचा पाया मजबूत करण्याची वेळ आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, अरुण खोरे, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, भाऊसाहेब डोळस, चंद्रकांत शेटे, कवयित्री स्वाती सामक, मानसी चिटणीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, विविध सामाजिक संस्थांचा सन्मान केला. भारतीय जैन संघटनेच्या शाळेतील दहावीचे विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. राजरत्न शिलवंत यांनी आभार मानले.
हेही वाचा