बारामती : पुढारी वृत्तसेवा
सोनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र अशोक बापूराव इंगवले (वय ३१) यांना देशसेवा बजावत असताना मंगळवारी (दि. १५) पंजाब येथे वीरमरण आले. यामुळे सोनगाव शोककुल झाले आहे. इंगवले यांचे पार्थिव मंगळवारी रात्री अथवा बुधवारी त्यांच्या मूळ गावी येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
अशोक इंगवले हे मागील ७ वर्षांपासून सीआरपीएफमध्ये जवान म्हणून देशसेवा बजावत होते. जम्मू-काश्मीर या ठिकाणीही देशसेवा बजावली होती. सध्या रांची या ठिकाणी कार्यरत होते. निवडणुकांमुळे ते पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.