जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवीची शहरात पहिल्यांदाच यात्रा भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. (Latest Pune News)
महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी मोठ्या आठ यात्रा भरतात. जेजुरी शहराची अर्थव्यवस्था येथे येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे यात्रा जत्रा वेळी जेजुरीकर नागरिक व्यवसायामध्ये गुंतले जातात. त्यामुळे यात्रा जत्रात सहभागी होता येत नाही. गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांना हक्काची यात्रा असावी.
यात्रेत धार्मिक विधी धार्मिक कार्यक्रमांसह कुस्ती, तमाशा, बैलगाडा शर्यती आदी मनोरंजनाचा आनंद लुटता यावा, यासाठी जेजुरीत जानाईदेवीची यात्रा सुरू करण्याबाबत जानाईदेवी मंदिरात जानाई देवी मंदिर ट्रस्ट, श्री खंडोबा पालखी सोहळा ट्रस्ट व ग्रामस्थांची बैठक शनिवारी (दि. 25) पार पडली. आता मंगळवारी (दि. 28) देवीला कौल लावून यात्रेचे स्वरूप ठरविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात येणार असल्याचे सुधीर गोडसे यांनी सांगितले.
जानाईदेवी नागरिकांचे व भाविकांचे जागृत श्रद्धास्थान आहे. देवीचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर दरीमध्ये असणाऱ्या निवकणे येथील आहे. दरवर्षी, महाशिवरात्रीनंतर जेजुरीतून जानाईदेवीचा पालखी सोहळा निवकणे येथे मार्गस्थ होतो. तेथेच देवीची यात्रा साजरी केली जाते. आता या यात्रेप्रमाणेच जेजुरीतही देवीची यात्रा भरविण्यात येणार आहे.
जेजुरी शहरातील ऐतिहासिक होळकर तलावाकाठी जानाईदेवीचे मंदिर होते. ते जीर्ण झाल्याने पाडून त्याजागी लोकसहभागातून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून ऐतिहासिक स्वरूप असणारे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरात जानाईदेवीची नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊन कलशारोहण करण्यात आले. नवरात्र उत्सवात धार्मिक व देखणे कार्यक्रम साजरे झाले.
बैठकीला जानाईदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, तसेच दोन्ही ट्रस्टचे पदाधिकारी राजेंद्र पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, संतोष खोमणे, माणिक पवार, पंडित हरपले, आप्पासाहेब बारभाई, रामदास माळवदकर, हनुमंत खोमणे, रोहिदास माळवदकर, दीपक माळवदकर, कृष्णा कुदळे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, गोविंद बेलसरे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, अजिंक्य देशमुख, तसेच हरिदास रत्नपारखी, विठ्ठल सोनवणे, नागू माळी, पालखी सोहळ्याचे प्रमुख नागनाथ झगडे, संदीप जगताप, नितीन राऊत, दीपक राऊत, महादेव माळवदकर तसेच अठरा पगड, बाराबलुतेदार समाजाचे जानाई भक्त उपस्थित होते.