पुणे: युद्धजन्य परिस्थितीत समाजमाध्यमात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर करणारी मुस्लिम तरुणी ही नुकतीच श्रीनगर येथील नातेवाकांकडे जाऊन आली होती. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असलेल्या तरुणीने इंस्टाग्राम शेअर केलेली पोस्ट ही पाकिस्तानातील व्यक्तीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांच्या न्यायालयाला दिली. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
युद्धजन्य परिस्थितीत समाजमाध्यमात तेढ निर्माण करणारे, तसेच अफवा प्रसारित करणार्या संदेशांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. तरुणीने समाजमाध्यमात तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारित केल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. (latest pune news)
त्यानंतर तिला अटक करत शनिवारी (दि. 10) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. विजयसिंह जाधव म्हणाले की, तरुणीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. ती वापरत असलेला मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक साधने पुराव्याच्या अनुषंगाने जप्त करत त्याचा तपास करायचा आहे. तिचे नातेवाइक श्रीनगर, काश्मीर येथे राहणारे असून त्याबाबत तपास करायचा आहे.
ती नुकतीच श्रीनगर येथे जाऊन आली आहे. त्याठिकाणी देशविरोधी काम करणार्या यंत्रणांच्या संपर्कात आली आहे का यादृष्टीने तपास करायचा आहे. युध्दजन्य परिस्थितीमध्ये समाजमाध्यमामध्ये प्रसारित केल्याने तिचा हेतू व उद्देश समजावून घ्यायचा आहे.
तिने केलेले कृत्य करण्यामागे अन्य कोणी व्यक्ती अथवा यंत्रणा काम करत आहे का यादृष्टीने तपास करायचा आहे. ज्या खात्यावरून तिने पोस्ट शेअर केली त्याबाबतची माहिती इन्स्टाग्रामकडून प्राप्त करायची आहे. तिने यापूर्वी काही पोस्ट प्रसारित केल्या आहेत का याचा तपास करायचा आहे.
भारत देशाच्या सार्वभौमत्व व अखंडत्वास धक्का पोहोचविण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का किंवा याकरिता कोणती व्यक्ती किंवा यंत्रणेचे पाठबळ तिला आहे का यासह विविध अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपीस पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने बचाव पक्षासह सरकार पक्षासह युक्तिवाद ऐकून घेत तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कर्मचारी आरोपीच्या वेशात
तरुणीने केलेल्या पोस्टमुळे शहरात संतापाची लाट उसळल्याने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. या वेळी न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरुणीवर हल्ला होऊ नये तसेच शहरातील शांतता बिघडू नये यासाठी पोलिसांनी तिच्यासारखाच पेहराव केलेली अन्य एक महिला पोलिस कर्मचारी तिच्यासोबत न्यायालयात हजर केली. दोघींना पाहिल्यानंतर न्यायालयाने विचारणा केली. या वेळी महिला कर्मचार्याने आपण पोलिस असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयातून रवानगी करतानाही त्याच पध्दतीने पोलिसांनी तरुणीला नेले.
आंदोलनाच्या माहितीनंतर पोलिस यंत्रणा अलर्ट
तरुणीने इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ लिहिलेली पोस्ट शेअर करताना ’पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा लिहिल्याचा दावा समाजमाध्यमांवर करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांनी याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.