भिगवण (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : मदनवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना सुरू होण्याआधीच वादाच्या कचाट्यात सापडली आहे. या योजनेचे जलस्रोत खडकवासला कालवा घेण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर झाला असताना नंतर बेकायदेशीर ठराव घेत हे जलस्रोत प्रदूषित उजनीत केल्याने या विरोधात दोन गट उभे ठाकले आहेत. मदनवाडी बचाव समितीच्या वतीने 7 जून रोजी बोंबाबोंब आंदोलन, तर विद्यमान ग्रामसदस्य अतुल देवकाते यांनी दि. 28 जून रोजी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून मदनवाडीची जलजीवन योजना सुरू होण्याआधीच वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
बोंबाबोंब आंदोलनाचे व प्राणांतिक उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींनी देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, मदनवाडी गावासाठी 19 कोटी रुपये खर्चाची जलजीवन योजनेचे काम नुकतेच सुरू झाले आहे. मात्र, उजनीचे पाणी कमालीचे प्रदूषित असल्याने या योजनेचे जलस्रोत खडकवासला कालव्यावरून घेण्याबाबत 4 मार्चच्या ग्रामसभेत बहुमताने ठराव संमत करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात जलस्रोताचे काम उजनीवरून सुरू करण्यात आल्याने व त्यासाठी 7 जून रोजी घेण्यात आलेला ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत उजनीचे पाणी प्रदूषित असल्याने काम त्वरित थांबवावे, अशी मागणी ग्रामसदस्य अतुल देवकाते यांनी करून दि. 28 जून रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
पाणी साठवण टाकीसुद्धा भिगवणच्या टेकडीवर घेण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी बोलताना केला आहे. दुसरीकडे दादासाहेब थोरात, तुकाराम बंडगर, रंगनाथ देवकाते, शरद चितारे यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनीही जलस्रोत बदलण्याच्या कारणावरून आक्रमक होत दि. 18 जून रोजी अहिल्यादेवी होळकर चौकात बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा व नंतर आंदोलन तीव— करण्याचा इशारा दिला आहे.
बेकायदेशीर असे काहीच नाही : सरपंच अश्विनी बंडगर
याबाबत सरपंच अश्विनी बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, 4 मार्चच्या ग्रामसभेच्या ठरावानंतर सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार मदनवाडी तलावाच्या खालील बाजूस साठवण टाकीसाठी लागणारी चार एकर जागा उपलब्ध नाही. कोणी बक्षीसपत्राने द्यायला तयार नाही, तसेच खडकवासला कालव्याचे पाणी तीन महिन्यांच्या अंतराने आवर्तन गृहीत धरले तरी साठवण टाकीत एवढा साठा यामधील काळात करणे अशक्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशनचे अधिकारी व तज्ज्ञांनी याचा सर्व आढावा घेत जागा बदलण्याचा व सात जूनच्या ग्रामसभेचा तसा ठराव घेण्यात आलेला आहे. त्यातही वर्क ऑर्डर मिळून सहा महिने होत आले आहेत, त्यामुळे वेळेत काम न केल्यास कालबाह्य ठरून योजना परत जाण्याचा धोका वाढला होता. उजनीचे पाणी प्रदूषित असले तरी फिल्टर करूनच वापर केला जाणार आहे. वरून गावात आरो फिल्टर वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसमजाने आरोप न करता सहकार्य करावे, असे मत बंडगर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा :