पुणेः कारागृह व सुधारसेवा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) जालिंदर सुपेकर यांची होमगार्डच्या उप महासमादेशकपदी बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.30) रात्री याबाबातचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांचे नाव चर्चत आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुपेकरांवर आरोप केले होते. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता.
वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे यांंच्या विरुद्ध वास्तव्याची खोटी माहिती देऊन शस्त्र परवाना घेतल्याच्या आरोपावरून वारजे आणि कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भुकूममध्ये वास्तव्यास असताना, या दोघांनी कर्वेनगर आणि कोथरुडमधील मोकाटेनगरमध्ये राहत असल्याचा भाडेकरार सादर केला होता. 2022 मध्ये या दोघांनी शस्त्र परवाने मिळविले होते. त्यावेळी सुपेकर अपर पोलिस आयुक्त प्रशासन या पदावर कार्यरत होते. त्यांच्या शस्त्रपरवान्यावर सुपेकरांची सही असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच, गेल्या आठवड्यात सुपेकर यांची गृह विभागाकडून चौकशीही करण्यात आल्याची माहिती आहे.