Leopard Captured Pudhari
पुणे

Jadhavwadi Leopard Captured: आंबेगाव तालुक्यात जाधववाडीत नर बिबट्या जेरबंद; गार ओढा, सुंदरमळा परिसरात भीती कायम

वन विभागाने उसाच्या शेताशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला; परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याने शेतकरी धास्तावले

पुढारी वृत्तसेवा

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जाधववाडी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाला. गुरुवारी (दि. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, जाधववाडीतील गार ओढा आणि सुंदरमळा परिसरात अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जाधववाडी ते थोरांदळे रस्त्यावरील गार ओढा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. शेतकऱ्यांना वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने त्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार, वनविभागाने पाच ते सहा दिवसांपूर्वी शेतकरी अंकुश गोविंद जाधव यांच्या घराजवळील उसाच्या शेताशेजारी पिंजरा लावला होता.

गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाला. ही माहिती मिळताच अंकुश जाधव यांनी वनविभागाला कळवले. त्यानंतर वन परिमंडळ अधिकारी आर. एन. फुलमाळी, रेस्क्यू टीमचे प्रज्वल आवारी आणि वनसेवक महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. पकडलेल्या बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

बिबट्यांचा वावर कायम

जाधववाडी परिसरात एक बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गार ओढा आणि सुंदर मळा परिसरात अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि शेतात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT