पुणे: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता 30 जून रोजी प्रसिद्ध होणारी प्राथमिक गुणवत्ता यादी 28 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
तसेच, अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलैऐवजी 1 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत दोन ते तीन दिवसांचा फरक पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
दहावीचा निकाल लागला की विद्यार्थी अकरावी, पॉलिटेक्निक आणि आयटीआयकडे वळतात. अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. त्यात आयटीआय प्रवेश प्रक्रियेला देखील विलंब झाला आहे. त्याचा परिणाम प्रवेशावर होण्याची शक्यता लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने नियोजित वेळापत्रकापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जूनला आणि अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलैला प्रसिद्ध होणार होती. त्याऐवजी आता या याद्या अनुक्रमे 28 जून आणि 1 जुलै रोजी प्रसिद्ध होतील. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया 7 जुलैपासून सुरू होणार आहे.
आयटीआय प्रवेशासाठी 15 मेपासून सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एक लाख 98 हजार 192 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यातील एक लाख 84 हजार 119 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले आहेत. एक लाख 81 हजार 125 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमांसाठी जवळपास तीन लाख विद्यार्थी अर्ज करत असल्याचे दिसून येते. यंदा देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https:/// admission. dvet. gov. या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
असे आहे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून, सायं. 5 वाजेपर्यंत.
प्रवेश अर्ज निश्चित करण्याची मुदत : 27 जून, सायं. 5 वाजेपर्यंत.
पसंतीक्रम / प्राधान्य सादर करणे : 28 जून, सायं. 5 वाजेपर्यंत.
प्राथमिक गुणवत्ता यादी : 28 जून, सायं. 5.30 वाजता.
हरकती सादर करण्याची मुदत : 30 जून, सायं. 5 वाजेपर्यंत.
अंतिम गुणवत्ता यादी : 1 जुलै, सायं. 5 वाजता.
पहिली प्रवेश यादी : 7 जुलै, सायं. 5 वाजता.
प्रत्यक्ष प्रवेश (प्रथम फेरी) : 8 ते 12 जुलै, सायं. 5 वाजेपर्यंत
दुसरी प्रवेश फेरी : 27 ते 22 जुलै
तिसरी प्रवेश फेरी : 27 जुलै ते 1 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : 6 ते 10 ऑगस्ट
संस्था स्तरावर समुपदेशन फेरी : 11 ऑगस्ट