गणेश खळदकर
पुणे : कौशल्य शिक्षणाकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या काही वर्षांत कमी होत असून, तंत्रशिक्षण अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशाकडे तो वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या नऊ वर्षांतील सर्वाधिक कमी म्हणजेच केवळ दोन लाख 20 हजार 291 विद्यार्थ्यांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे आयटीआयकडे पाठ अन् पॉलिटेक्निकची कॉलर ताठ, असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.
रोजगाराची संधी म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. पारंपरिक शिक्षणामुळे सध्या वाढत असलेली बेरोजगारी व नोकरीच्या कमी असलेल्या संधी, यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल असतो. त्यातही इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रमांना राज्यातील विद्यार्थ्यांनी पसंती असतात. परंतु, यंदा पहिल्यांदाच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने वेळखाऊ वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी तसेच प्रवेश घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीनंतर अकरावी, पॉलिटेक्निक आणि आयटीआय असे तीन पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. यातील पहिले प्राधान्य विद्यार्थी आयटीआयला देत असतात. त्यामुळेच गेली अनेक वर्षे उपलब्ध जागांच्या तिप्पट विद्यार्थ्यांचे अर्ज येत असल्याचे चित्र होते. परंतु, गेल्या काही वर्षात यामध्ये घट होत गेली आणि यंदा तर उपलब्ध जागांच्या काहीच प्रमाणात जास्त अर्ज आले. आयटीआयसाठी नोंदणीची घटत जाणारी संख्या ही त्यांच्यासाठी धोकादायक आहे. परंतु, याचदरम्यान गेली काही वर्षे दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा दीड लाखावर विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रवेशासाठी नोंदणी केली असल्याचे दिसून येत आहे. तर आयटीआयसाठी एक लाख 47 हजार 368 जागा उपलब्ध असताना केवळ दोन लाख 20 हजार 291 विद्यार्थ्यांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे आयटीआयपेक्षा विद्यार्थ्यांचा कल तंत्रशिक्षणकडे जास्त असल्याचे दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कौशल्य शिक्षणापेक्षा तंत्रशिक्षणात जास्त संधी निर्माण झाल्या
दहावीच्याच पात्रतेवर तंत्रशिक्षण घेता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये अद्ययावत के स्कीम अभ्यासक्रमांचा समावेश
आयटीआयपेक्षा तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांचा प्रभाव चांगला
आयटीआयपेक्षा तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिष्यवृत्तींचा लाभ
यंदा आयटीआय प्रवेशासाठी चुकीच्या पद्धतीने वेळापत्रकाची अंमलबजावणी
यंदा आयटीआयसाठी नोंदणी कमी झाली असली तरी उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा दर वर्षीपेक्षा अधिक प्रवेश करण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी योग्य प्रकारे वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, सर्व आवश्यक सुधारणा करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआयचे प्रवेश घ्यावेत, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे.मंगलप्रभात लोढा, मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग