Pune News : छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पाहण्याची पर्यटकांना संधी file photo
पुणे

Pune News : छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पाहण्याची पर्यटकांना संधी

Special tourist train: विशेष पर्यटक ट्रेन ’छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Shivaji Maharaj tourism initiative

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसी), राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ’छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ची घोषणा केली आहे. ही यात्रा 9 जून पासून सुरू होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहली दरम्यान महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. याबाबत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रधान सचिव,( पर्यटन) डॉ. अतुल पाटणे, पर्यटन संचालक बी. एन. पाटील आणि व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सुचना दिल्या आहेत.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून विविध अंगांनी तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली यात्रेचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.

असे होणार पर्यटन दर्शन

  • पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल.

  • प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, ज्ञानवृद्ध गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने याला भावनिक व आध्यात्मिक स्पर्श दिला जाईल.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजोमय इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती हे जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे.

  • या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.

ही यात्रा म्हणजे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक सहल आहे.
दिपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT