पुणे

पुणे : डुग्गूच्या अपहरणकर्त्याचा तपास अद्यापही ‘डुगू… डुगू’च!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर त्याचा व आरोपीचा अवघ्या तीन तासांत शोध पोलिसांनी लावला. मात्र, महिनाभरापूर्वी बालेवाडी येथून डॉक्टरचा मुलगा डुगू याच्या अपहरणाचा तपास डुगू….डुगूच सुरू असून, अपहरण करणारा आरोपी गुन्हा करूनही मोकाटच आहे.

11 जानेवारी रोजी स्वर्णव चव्हाणचे (डुग्गू) दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्याची व गुन्हे शाखेची बरीच पथके कामाला लावली. जंगजंग पछाडूनही पोलिसांच्या हाती काही लागले नव्हते. याचदरम्यान डुग्गूच्या अपहरणाचा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाला. समाज माध्यमांवर डुग्गूच्या सुटकेसाठी नागरिक प्रार्थना करू लागले होते. प्रत्येक घरात डुग्गूच्या अपहरणाची बातमी समाज माध्यमातून पोहचली होती. असे असतानाच अपहरणकर्त्याने पुनावळे येथील एका सुरक्षारक्षकाजवळ डुग्गूला गुपचूप सोडले. परंतु, डुग्गू मिळून 15 दिवस उलटूनही अपहरणकर्ता पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. त्यामुळे डुग्गू मिळाला; पण डुग्गूच्या अपहरणकर्त्याचा तपास डुगू… डुगूच सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या पुणे शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या सीसीटीव्हीचे जाळे आहे. मात्र, या वेळी ते किती कुचकामी आहेत, हे दिसून आले. काही ठिकाणी अपहरणकर्ता सीसीटीव्हीत कैददेखील झाला. मात्र, तो कोठून आला, कोठे गेला, हेच अद्याप पोलिसांना समजू शकले नाही. अपहरणकर्ता चिखली परिसरातील सीसीटीव्हीत शेवटचा कैद झाला. त्याचा शोध घेण्यासाठी अजून पोलिस पथके परिसरात तळ ठोकून आहेत. अतिवरिष्ठ अधिकारी दररोज या घटनेचा आढावा घेतात. मात्र, एरवी 'कानून के हात बहुत लंबे होते हैं' असे म्हटले जाते. परंतु, अपहरणकर्ता या हातांना चकवा देतोय.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT