पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी नवीन टर्मिनलवरून बँकॉक, सिंगापूर आणि दुवईसाठी उड्नणी झाली. या तीन आंतरराष्ट्रीय विमानसेवेद्वारे पहिल्याच दिवशी साडेतीनशेपेक्षा अधिक प्रवाशांनी नवीन टर्मिनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रवास केला. या वेळी प्रवाशांना नवीन टर्मिनलमधील अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता आला.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून, या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र, इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे नवीन टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय उडाने बंद होती. आता ही प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. सोमवारी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला होता.
नवीन टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी तीन आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली. याद्वारे साडेतीनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे.- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ