पुणे

अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 : रेल्वेच्या विकासकामांसाठी भरीव तरतूद

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मध्य रेल्वेसह पुणे विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विभागातील अनेक विकास कामांचा वेग वाढणार आहे. परिणामी, अनेक दिवसांपासून रखडलेली नवीन लाईन, वाहतूक सुविधा आणि आरओबींची (रोड ओव्हर ब्रीज) कामे वेगाने होणार आहेत. पिंक बुकमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

डबल डायमंड स्लिपसाठी 25 कोटींची तरतूद

पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये 5 ठिकाणी डबल डायमंड स्लिप आहेत, ते काढण्यात येणार आहे. त्या जागी प्लेन टर्न आऊट टाकण्यात येणार आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची कामे सहजरीत्या होण्यास मदत मिळेल. एका ट्रॅकवरून दुसर्‍या अथवा तिसर्‍या ट्रॅकवर जाण्यासाठी डबल डायमंड स्लिपचा वापर होतो. हा टर्न आऊटचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे-लोणावळा, पुणे-दौंड वाडी अतिरिक्त मार्गिका बनणार

राज्यात 3 कॉरिडॉर (मार्गिका) तयार करण्याचे नियोजन आहे. हे कॉरिडॉर 40 हजार किलोमीटर अंतराचे असणार असून, ते तयार करण्यासाठी 6 ते 8 वर्षांपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे मार्गावरील प्रलंबित तिसर्‍या चौथ्या मार्गिकेचा प्रश्न मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, या मार्गावरील रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी कोंडी सुटणार आहे. तसेच, पुणे-दौंड वाडी मार्गावर एनर्जी पदार्थांची वाहतूक करण्यासाठी सुध्दा अतिरिक्त कॉरिडॉर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येथील एनर्जी पदार्थांची मालवाहतूक वेगाने होणार आहे.अंतरिम अर्थसंकल्प 2024 जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील विविध राज्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वे पुणे विभागाच्या मुख्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलींद हिरवे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT