बारामती: बारामती शहर आणि उपनगरातील बहुतांश व्यावसायिक प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. एमआयडीसी भागात प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्वाधिक वापर होत आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक कोणत्याही नियमांचे पालन न करता सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.
बारामती नगरपालिकेने प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी घालूनही व्यावसायिक अजूनही कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. यापूर्वी पालिका कॅरीबॅग वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करीत होती. मात्र, दंडात्मक कारवाई थंडावली आहे. त्यामुळे प्लास्टिक बॅगचा वापर वाढला आहे. (Latest Pune News)
शहरातील स्थानिक व्यावसायिक ग्राहकांना प्लास्टिक कॅरीबॅग देत नाहीत. मात्र, भाजीमंडई परिसरातील छोटे, मोठे व्यावसायिक आणि फळविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. यामुळे सर्वांना सारखेच नियम करावेत अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. बारामतीतील काही सूज्ञ नागरिक कापडी पिशव्यांचा वापर करत पर्यावरण रक्षणाचे काम करीत असताना अन्य नागरिकांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.
पर्यायाने बारामतीत प्लास्टिक बंदी फक्त नावालाच आहे. राज्य सरकारने प्लास्टिक कॅरीबॅगसह थर्माकोल व प्लास्टिक ताट, वाटी, चमचे आदींसह तत्सम वस्तूंवर बंदी आणली. पर्यावरण रक्षण हा त्याच्यामागील उद्देश होता. मात्र, बारामतीत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
एकीकडे नगरपालिका प्रशासन व कर्मचारी प्लास्टिक वापरू नका असे सांगत असताना काही जण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पालिका प्रशासनाने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.