आळंदी: आळंदी - वडगाव रस्त्यावर भरधाव असलेली कार रस्ता क्रॉस करून थेट दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वडगाव रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास एक भरधाव कार आळंदीकडून वडगावकडे चालली होती. गाडीचा वेग अधिक असल्याने समोर आलेल्या वाहनांच्या नादात कारचालकाने कट मारला; मात्र वेगावर नियंत्रण नसल्याने गाडी थेट रस्ता ओलांडून रस्त्यालगत असलेल्या दुकानात घुसली. (Latest Pune News)
गाडी अंगावर आलेली पाहून येथे उभे असलेले नागरिक बाजूला झाले. कारचा चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान पुण्यात अशाच भरधाव कारने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उडविल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावरून रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
आळंदीत देखील त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली; मात्र या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच योग्यती कारवाई करणे, मद्यधुंद चालकांवर ड्रिंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करणे गरजेचे असल्याचे आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते निसार सय्यद यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना सांगितले.