इंदापूर: संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील इंदापूर तालुक्यातील मुक्कामाच्या ठिकाणांची गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी पाहणी केली. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे खुडे यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी खुडे यांनी सोमवारी (दि. 20) इंदापूर तालुक्यातील सणसर, निमगाव केतकी, इंदापूर आणि सराटी, या चार पालखी सोहळ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी केली. निमगाव केतकी या ठिकाणी 28 जून रोजी हा पालखी सोहळा मुक्कामी येणार आहे. गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या जागेत पालखीचा मुक्काम असतो. (Latest Pune News)
त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली तसेच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महिना अगोदरच त्यांनी ग्रामपंचायतीसह संबंधित इतर शासकीय विभागांना सूचना दिल्या. पालखीतळासह गावात ठिकठिकाणी स्वच्छता, पाणीपुरवठा, विजेसह इतर सर्व सोयीसुविधा सज्ज केल्या जातील. तसेच गावामध्ये 12 ठिकाणी निर्मल ग्रामशौचालयाची युनिट ठेवली जातात. तेथे दिवाबत्तीची आणि पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
निरा डावा कालव्याला पाणी सोडण्याची सूचना
पालखी सोहळ्यासाठी जवळपास 200 ते 250 टँकरने पाणी भरण्याचे ठिकाण असलेल्या निरा डावा कालव्यालगतच्या बापूभाई नाला येथील विहीर आणि पंपाची त्यांनी पाहणी केली. पालखी सोहळ्यासाठी निरा डावा कालव्याला पाणी सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला केल्या.
ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप यांनी पालखी सोहळ्यासाठी लागणार्या सर्व सोयीसुविधांची माहिती गटविकास अधिकार्यांना दिली. या वेळी केतकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य माणिक भोंग यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यंदा अंथुर्णे गावातील मुक्काम नाही
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसर येथील मुक्काम आटोपून राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे गावात मुक्कामी विसावत असतो. मात्र, यंदा तिथी क्षय असल्यामुळे या ठिकाणचा मुक्काम नसल्याचे पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. गणेशमहाराज मोरे यांनी सांगितले.