जीबीएसग्रस्त भागातील पाण्याची तपासणी करा; महापालिकेला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचना Pudhari File Photo
पुणे

GBS Affected Area: जीबीएसग्रस्त भागातील पाण्याची तपासणी करा; महापालिकेला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचना

‘जीबीएस’चा प्रसार दूषित पाणी आणि अन्नातून झाल्याचे निष्पन्न झाले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात जानेवारी महिन्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. विशेषत:, सिंहगड रस्ता परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ‘जीबीएस’चा प्रसार दूषित पाणी आणि अन्नातून झाल्याचे निष्पन्न झाले.

जीबीएसचा प्रादूर्भाव संपुष्टात आला असला तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोखीमग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महापालिकेला देण्यात आल्या आहेत. (Latest Pune News)

पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. कॉलरा, टायफॉईड, कावीळ, अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. जीबीएसच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला अतिसाराची लक्षणे दिसून आली होती. पावसाळ्यात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीनंतर याबाबत आरोग्य विभागाकडून महापालिकेला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहून जोखमीच्या भागांमधून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची विनंती केली आहे.

बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी संवेदनशील भागांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेची लवकरात लवकर तपासणी करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे नमूद करणारा अहवाल आरोग्य विभागास तत्काळ पाठवावेत, असेही त्यांनी सांगीतले आहे. शहरात याआधी जीबीएसचे 141 निश्चित रुग्ण आणि 9 संशयित मृत्यू नोंदवले होते. पाणी शुद्धीकरण अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवश्यक सुरक्षा प्रक्रिया आणि प्रणालींचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘रिफ्रेशर’ प्रशिक्षण देण्याचाही आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

‘जीबीएस’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. साथ अधिकृतरीत्या संपली असली, तरी अजूनही काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. ‘जीबीएस’चे रुग्ण वर्षभर दिसतात. रुग्णांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. निना बोराडे, आरोग्य विभाग, महापालिका, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT