महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तहसील कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शक्य झाल्यास पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष व हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, चास, लौकी, चांडोली, पिंपळगाव खडकी, शिंगवे आदी गावांतील शेकडो शेतकर्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे. नांगरट केलेल्या शेतात दोन फुटांपेक्षा जास्त उंचीचे पाणी साचल्याने शेताचे बांध फुटले, तर काही गावांमध्ये जमिनीची माती खरवडून गेली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रथमच पाऊस झाला. चास, पिंपळगाव गावात तर अक्षरशः ढगफुटी झाली. (Latest Pune News)
चास येथील विशाल बारवे या शेतकर्याचा सुमारे 200 पिशवी कांदा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे शेतकर्यांनी सांगितले. पावसामुळे पालेभाज्यावर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे कोथिंबीर पीक पाण्यात राहिल्याने पिवळे पडले, तर कोथिंबिरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कोथिंबीर उपटता आली नाही. जुड्या बांधलेली कोथिंबीर बाजारपेठेपर्यंत नेता आली नाही.
परिणामी, लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. काढणीला आलेली बाजरीची कणसे पाण्यात भिजल्याने मळणी केल्यानंतर दाणे काळे पडण्याची शक्यता शेतकर्यांकडून वर्तविली जात आहे. जनावरांसाठी वर्षभर पुरणारा वाळलेला चारा, वैरण संपूर्णपणे पाण्यात भिजल्याने या वैराणीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
बुरशीजन्य वैरण खाल्ल्याने जनावरांना पोटाचे आजार उद्भवू शकतात. पावसामुळे वाळलेल्या चार्याची प्रचंड हेळसांड झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी चासकर यांनी केली आहे.
कळंब येथील पर्जन्यमापक यंत्रामध्ये मागील आठवड्यात एकाच दिवशी 40 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती कळंबचे मंडल अधिकारी शरद दोरके यांनी दिली. घोडेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नॉट रिचेबल असल्याने माहिती उपलब्ध झाली नाही.